“मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा सके” अशी वाक्य
कायमच प्रेरणादायी वाटतात,
जेव्हा आपण करत असलेल्या कामातून नक्की
काय परिणाम साधला जाणार आहे हे माहीत नसतं.
मी Voice
Over च्या क्षेत्रात
पाऊल ठेवलं तेव्हा माझ्या एका मित्राने एक सल्ला दिला होता. काम स्विकारण्यापूर्वी
या ४ गोष्टींपैकी एका तरी गोष्टीचा लाभ होतोय का ते बघ आणि मग ते करायचं का हे ठरव
… एकतर त्या कामातून पैसे मिळतायत का?, दुसरं, त्या कामातून तुला काही शिकायला मिळतंय का?, तिसरं, त्या
कामातून तुझी स्वतःची equity
तयार व्हायला मदत होते आहे का? आणि चौथं म्हणजे त्या कामातून तुला स्वतःला
समाधान /आनंद मिळतोय का?
आता पैसे तर सगळ्यांनाच कमवायचे असतात. पण शिकाऊ उमेदवार असताना
आमच्या क्षेत्रात ‘तुला शिकण्याची संधी मिळतेय’ अस सांगून बरेच अनुभवी मार्गदर्शक आपल्याला
आपण केलेल्या कामाचं जेमतेम मानधन देतात.
तरी यांच्या हाताखाली काम करायला मिळतंय ह्या समाधानाने अनेक नवशिके ही मेहनत
वर्षानुवर्ष करतात. त्यांची ही मेहनत फळाला येते ….. नाही असं अजिबात नाही. पण त्या बरोबरीने त्या
स्पर्धात्मक वातावरणातल्या काही वाईट विचार प्रवृत्तींनाही हे बळी पडतात आणि
स्वतःही त्याचा भाग बनून जातात. काही जणांच्या वाट्याला भरपूर कामं किंवा /
आणि प्रसिद्धी येतेही….तर काहीजणांच्या वाट्याला तीच ….. अखंड धडपड.
असो, कौशल्य आत्मसात करण्याचा प्रत्येकाचा
मार्ग वेगळा.
मी ही काही काळ निवडक अनुभवी लोकांचे उंबरे झिजवले … अत्यंत कमी
मानधनात supervision,
coordination, भाषांतर
सब कुछ केलं .. १२ तासांच्या मेहनतीत स्वतःच्या मनाची शांती आणि शारीरिक स्वस्थता
घालवून ही अमुक अमुकच्या हाताखाली मी घडतेय अश्या फसव्या समाधानाने गधा मजुरीही
केली.
एका क्षणाला मी या सगळ्यातून बाहेर पडले … मी तसही अंध
व्यक्तींसाठी थोडीफार पुस्तकं वाचत होते. समाधान होतं ..फक्त प्रवास, वेळ या इतर गोष्टींचं गणित जमत नव्हतं. त्याच
सुमारास ध्वनिमुद्रणाचं आवश्यक ते सामान विकत घेऊन ठेवलं होत. आता घरबसल्याच अर्थपूर्ण
काहीतरी करावं असं डोक्यात होतं. आणि तेव्हा विनोबा भावे फौंडेशनच्या सुभाष
पवारांचा प्रस्ताव समोर आला. “विनोबांचं साहित्य तू तुझ्या आवाजात record करशील का?”
काम कठीण वाटलं होतं तेव्हा…. कारण
समजून उमजून करायला हवं हे काम. जबाबदारी आहे. Timepass नाही काही!! विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती ही की गांधी अगदी बऱ्याच दूरवर पसरले आहेत. अगदी नवीन
पिढीलाही गांधी मुखोद्गत नसले तरी त्यांचं नाव अपरिचित नाही. काहींसाठी आदर्श
म्हणून, काहींसाठी जगण्याचं तत्वज्ञान म्हणून, तर काहींसाठी निव्वळ फॅशन म्हणून. विनोबांच्या
बाबतीत मात्र काही अंशी ‘who was he?’ अशी परिस्थिती अजूनही आहे. म्हणजे हे करणं आवश्यक आहे.
चला … ठरलं ताबडतोब हे काम
हातात घेउयाच… सर्वप्रथम त्यांचे विचार त्यांच्या खऱ्याखुऱ्या अभ्यासक
आणि उपासकांकडून (अंध अनुयायांकडून अजिबात नाही) समजून घेतले. काही निवडक
महत्त्वाची अशी पुस्तकं ध्वनीमुद्रित केली. बराच काळ गेला. गीता प्रवचनेच्या ऑडिओ
बद्दल आणि स्क्रिप्ट बद्दल सतत ई-मेल मधुन काही प्रश्न, काही प्रतिक्रिया येत राहिल्या. माझ्या
क्षेत्रात मी ही माझ्या परीने स्थिरावत चालले होते. Voluntary रेकॉर्डिंग करायला आता वेळच नाही.. एव्हढी!!.
आणि अचानक परवा विनोबा भावे फौंडेशनचा फोन आला की तुमचा सत्कार
करायचा आहे. कारण काय तर विनोबांचं साहित्य digital माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केल्याबद्दल. हा एक
आश्चर्याचा धक्काच होता. अजून त्यांचं निम्म साहित्यही रेकॉर्ड करून झालं नव्हतं.
मात्र आनंद सत्काराचा नसून याचा होता की ज्या हेतूने ते काम हाती घेतलं तो सफल
होतो आहे… यापुढेही होईल.
आणि न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते सत्कार
झाला.
मित्राने कधी काळी दिलेल्या ४ गोष्टींमधल्या ३ गोष्टी तरी सफल
झाल्या त्याही आपसूक … आणि मिळाला तो
शुद्ध आनंद!!
अर्थात आमच्या क्षेत्रातल्या काही लोकांनी नाकं मुरडली .. ‘इसमे
क्या मिला तेरे को? क्यू वक्त बरबाद करती है तू इन चीज़ों
में?”..
त्यांनी जवळपास मला वेड्यातच काढलं. (एरवी ही काढतातच) :))
मला मात्र नव्याने हे काम.. जसा वेळ मिळेल तसं करत राहण्याची प्रेरणा
मिळाली. पाठीवर कौतुकाची थाप पडली. खूप बरं
वाटलं .. माझा मार्ग अगदीच काही चुकीचा नव्हता आणि त्याने फक्त मलाच मदत
झाली असं नाही.. तर ..पैशाच्या पाठी धावणाऱ्या असंतुलित
जगाचा संतुलितपणा राखण्यासाठी चाललेल्या कामात काही अंशी सहभागी होता आलं
याचं समाधान मिळालं.
माधवी गणपुले